तळेगाव, दि. १९ आॅक्टोबर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेली मागील ११ दिवसांपासूनची धामधूम शनिवारी सायंकाळी थांबेल. शनिवार (दि. १९) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. सोमवारी (दि. २१) सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु होणार असून त्यापूर्वीच्या ४८ तासात निवडणूक आयोगाची करडी नजर उमेदवारांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर असेल.
शेवटच्या टप्प्यात विविध यंत्रणेद्वारे आपला प्रचार करणे, मतदारांच्या गाठी-भेटी, कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या दिवसाची संपूर्ण तयारी करवून घेणे अशा कामांमध्येच उमेदवारांचा हा दिवस जाणार आहे. दरम्यान, राज्यात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरलेल्या मावळात यंदा चुरशीची लढत असल्यामुळे ‘कोण होणार आमदार’ यावर चर्चेला आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
मावळ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या २५ वर्षांपासून भाजपने इथे आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आमदारपदी असलेल्या आणि काही महिन्यांपासून राज्यमंत्रीपद विराजमान झालेल्या बाळा भेगडे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपात बंडाळी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात निष्ठेने कार्यरत असलेले आणि तालुक्यात आपल्या विविध विकासकामांमुळे चर्चेत आलेले सुनिल शेळके हे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला. अर्ज भरण्याच्या दिवशीच त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपला यंदाची लढत सोपी राहिली नसल्याची जाणीव झाली.
अर्ज भरलेल्या दिवसापासूनच राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी मतदारसंघाचा झंझावाती दौरा सुरु केला. पदयात्रा, प्रचारफेरी, कोपरा सभा, वैयक्तिक गाठी-भेटी यावर शेळकेंनी भर दिल्यामुळे अल्प काळात मावळ तालुक्यातील बहुतांश भागातील मतदारांपर्यंत ते पोहोचू शकले. नगरसेवक म्हणून काम करत असतानाही अनेक सामाजिक कामांमुळे, स्वखर्चाने केलेल्या विकासकामांमुळे सुनिल शेळके यांचे नाव मावळवासीयांना सुपरिचित होतेच. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मुद्देसूद पण थेट बोलणे, साधी राहणी, सर्व स्तरातील लोकांना आपुलकीने वागणे, भारंभार आश्वासने देण्यापेक्षा कामे करून दाखवणे यामुळे शेळके यांच्याभोवती लोकांचा गराडा पडतोच, असे चित्र दिसले. त्यामुळे यंदा मावळवासीय सुनिल शेळके यांच्याच गळ्यात विजयाची माळ घालणार असल्याचे बोलले जात आहे.
मावळ मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या उमेद्वारांमध्येच होणार आहे. भाजपकडून आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत कडवी झुंज देत आहे. अटीतटीच्या या लढाईत ‘कोण होणार आमदार?’ या चर्चेला सध्या उधाण आले आहे.