नागपूर,दि.२८सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बाबासाहेबांचा राजकीय पक्ष होता. मात्र, वंचित आघाडीची स्थापना करताना प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षालाच यापासून वंचित ठेवले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचा विचार संपवायला निघाले असून ते बाबासाहेबांपेक्षा मोठे झाले का, असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.
‘पीरिपा’च्या मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत प्रा. कवाडे यांनी आंबेडकरांवर आरोप केले. प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाचे काय वावडे आहे माहिती नाही
समविचारी पक्षांची बांधणी करायची असेल तर प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षांना विचारात घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी आम्हाला विचारातच न घेतल्याने आम्ही बिन बुलाये मेहमान का व्हावे? बाबासाहेबांनी राजकीय विचार पोहचवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर राजकीय विचार ओलांडत आहेत.
कधी काळी शाळा, महाविद्यालयांमधून मिळणऱ्या प्रमाणपत्रावरून विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख खोडून काढावा, अशी मागणी करणारे प्रकाश आंबेडकर आज प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर त्याच्या जातीचा उल्लेख करीत आहेत. त्यामुळे हा जातीय राजकारणाला खतपाणी घालण्याचा प्रकार असून प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या जाती अंताचा विचार संपवायला निघाल्याचा आरोपही प्रा. कवाडे यांनी केला. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत असून आम्हाला सहा जागा देण्याचे आश्वासन मिळाले आहे. भंडारा विधानसभेची जागा निश्चित झाली असून पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे आमचे उमेदवार राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पक्षातर्फे भीमसैनिकांच्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रा. कवाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.