पिंपरी, दि.26 आॅगस्ट 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड शहरात स्वतःचे घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऐश्वर्यम ग्रुप यांच्यासोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे (पीपीपी) सर्वसामान्य नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चिखलीतील देहू-आळंदी रस्ता येथील गृहप्रकल्पात अल्प दरात स्वतःचे घर खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक बचतही होणार आहे. महापालिका व खासगी बांधकाम व्यावसायिकांमध्ये साकारत असलेला हा शहरातील पहिलाच गृहप्रकल्प आहे, अशी माहिती आज (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिखलीतील ऐश्वर्यम हमाराचे संचालक सतीश अग्रवाल, दिपक माने, महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.
या योजनेबाबत अधिक माहिती अशी आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नावाजलेले आणि विश्वासू बांधकाम व्यावसायिक म्हणून ऐश्वर्यम ग्रुपची ओळख आहे. आता महापालिकेने ऐश्वर्यम ग्रुपसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप करार केला असल्यामुळे नागरिकांना स्वस्त घरांची पर्वणी लाभणार आहे. ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र सरकारची मान्यता आहे. या प्रकल्पात एकूण 2 हजार 132 घरे असून त्यामध्ये ईएब्ल्यूएस व एलआयई या गटासाठी महापालिकेच्या मान्यतेने विकासकाकडून 1 हजार 169 घरांचे वितरण केले जाणार आहे. या प्रकल्पात घर घेणार्या एलआयई गटातील ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळू शकेल.
ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पात ज्या 1 बीएचके घराची 25 लाख 50 हजार अशी मूळ किंमत होती ते घर आता या योजनेमुळे ग्राहकांना घराच्या आकारानुसार 15 लाख 50 हजार ते 19.73 हजार मिळेल. 38 लाखात मिळणारे 2 बीएचके घर आता घराच्या आकारानुसार 21 लाख 16 हजार ते 34 लाख 81 हजार रुपयात मिळेल. या विशेष भागीदारीमुळे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, जीएसटी, लीगल चार्जेस, इन्फ्रा व इतर शुल्क असे सर्व या किमतीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. प्रकल्पात घर घेणार्या ग्राहकांना अग्रगण्य बँकांकडून कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम हे वैशिष्ट्य असणार्या ऐश्वर्यम हमारा या प्रकल्पात राहायला येणार्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण विचार करूनच येथील घरे बांधली आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा व इतर अत्याधुनिक सुविधा इथे देण्यात आल्या आहेत.
या योजनेचे मागणी अर्ज ऐश्वर्यम हमाराच्या साईट ऑफिसमध्ये आणि www.aishwaryamhamara.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यालयातही हे मागणी अर्ज मिळू शकतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच, योजनेचे अर्ज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये उपलब्ध आहेत.
.