Home ताज्या बातम्या माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निधन

0


नवी दिल्ली २४आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास प्रतिनिधी):- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे ९ ऑगस्ट रोजी जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून जेटली यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. यादरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यासह अनेक बड्या नेत्यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सगळ्यांनाच जेटलींची प्रकृती लवकरच सुधारेल अशी आशा होती. मात्र, जेटलींची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने देश एका अभ्यासू व संयमी नेता आणि उत्कृष्ट संसदपटूला मुकला आहे.२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारच्या कारभाराची घडी बसवण्यात अरूण जेटली यांचा मोठा वाटा होता. अडचणीच्या काळात सरकारची बाजू समर्थपणे मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीतही जेटलींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिले होते.
मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार सुरु होते. २०१८ मध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्य़ांनी साधारण तीन महिने विश्रांती घेतली होती. या काळात पीयूष गोयल यांनी हंगामी अर्थमंत्री म्हणून कारभार सांभाळला होता. या आजारपणातून सावरत असतानाच जेटली यांना पेशीचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. यासाठी त्यांनी परदेशात जाऊनही उपचार घेतले होते. या सगळ्यामुळे जेटली यांनी सार्वजनिक जीवनापासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. त्यांनी यंदा लोकसभा निवडणुकही लढवली नव्हती.

Previous articleभारत बांगलादेश सीमेवरील सुतारकंडी येथे बीटिंग द रिट्रीट संचालन सुरु करावे – केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले
Next articleश्रेयवादासाठी उद्घाटनाची ‘लगीनघाई’ राष्ट्रवादी शहराध्यक्षांची खेळी ः पिंपरीगावात वाघेरे-वाघेरेंमध्येच जुंपली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − 3 =