अकोला,२६ जुलै२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या अकोला जिल्ह्यातील वीर सुपूत्रांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इमारत व सुविधांचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याचे गृह(शहरे), बंदरे, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या अभिनव कार्यक्रमाद्वारे ‘कारगिल विजय दिन’ साजरा करण्यात आला.
शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी एकत्र येऊन हा रुग्णसेवेचा वसा चालवावा, असे आवाहन यावेळी डॉ.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ.पाटील यांच्यासमवेत आ.बळीराम सिरसकर, कारगिल युद्धात सहभागी झालेले जिल्ह्यातील वीर सुपूत्र वायुयोद्धा सुनिल उपाध्ये, नायक वसंतराव चतरकर, सुभेदार विष्णू डोंगरे,नायक मोहम्मद शेख ख्वाजा, नायक मोहम्मद शारीक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कमलाकर घोरपडे, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.अपर्णा माने, माजी आमदार नारायण गवाणकर,नगरसेवक आशिष पवित्रकार, हरिष अलिमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कारगिल विरांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभाग इमारत आणि निवासी वैद्यकीय अधिकारी वसतीगृह इमारतीचे उद्घाटन करुन लोकार्पण करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.पाटील म्हणाले की, तयार असलेल्या वास्तू व त्यांच्या सेवा या नागरिकांना पर्यायाने रुग्णांना उपलब्ध व्हाव्या या हेतूने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी ज्यांनी आपले जीवन देश रक्षणासाठी अर्पण केले आहे अशा वीर जवानांच्या हस्ते हे लोकार्पण होणे यासाठी आजचा कारगिल विजय दिन हे सर्वोत्तम औचित्य असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा होय. ही सेवा अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या जोडीला नागरिकांनीही सहभाग द्यावा व रुग्णसेवेचा वसा चालवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांमधून मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सहयोगी प्राध्यापक डॉ.धर्मेंद्र राऊत यांनी केले.