Home ताज्या बातम्या धनगर समाजाच्या विकासासाठी १३ नव्या योजना,‘महाज्योती’च्या माध्यमातून ज्योतीदूत, जलदूत, सावित्रीदूत पथदर्शी कार्यक्रम...

धनगर समाजाच्या विकासासाठी १३ नव्या योजना,‘महाज्योती’च्या माध्यमातून ज्योतीदूत, जलदूत, सावित्रीदूत पथदर्शी कार्यक्रम राबविणार :- कामगार मंत्री डॉ.संजय कुटे यांची माहिती

0

मुंबई, दि. 30 जुलै 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :–  सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, साशैमाप्र, विजाभज आणि विमाप्र मंत्री डॉ.संजय कुटे यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने ‘महाज्योती’ संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत आहे. ही संस्था सारथी व बार्टीप्रमाणे विविध स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करणार आहे. यावेळी पणनमंत्री राम शिंदे, पदुममंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

डॉ.संजय कुटे यांनी पावसाळी अधिवेशनात दि.०२ जुलै, २०१९ रोजी मागासवर्गींयांच्या कल्याणासाठी सारथी, बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी समितीचा अहवाल देऊ अशी घोषणा विधिमंडळात केली हेाती. त्यानुसार एका महिन्याच्या आत दि.२९ जुलै, २०१९ रोजी मुख्यमंत्री महोदयांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

डॉ.संजय कुटे म्हणाले, महाराष्ट्रातील मागासवर्गीयांच्या विकासामध्ये फुले, शाहू, आंबेडकर या तीन महामानवांचा अमूल्य वाटा आहे. शाहू महाराजांच्या नावाने सारथी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी या संस्था कार्यरत आहेत. महाज्योती या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे तसेच प्रादेशिक कार्यालय बुलढाणा व नागपूर येथे असेल. सन २०१९-२० मध्ये खर्च १३२४.६८ लाख तर १९२०-२१ साली एकूण ३७९११.३४ लक्ष इतका राहील.

• महाज्योती या संस्थेमार्फत पुढील कार्य अपेक्षित आहे –
• मागासवर्गीय व दुर्लक्षित आणि वंचित समाजाच्या स्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण करणे
• स्वयंरोजगार व रोजगारासाठी प्रशिक्षण व अन्य प्रकारची मदत उपलब्ध करून देणे
• शेती व इतर औद्योगिक व्यवसायांची स्थापना करणे यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
• समुपदेशन करणे व हेल्पलाईन सुरू करणे
• एम.फिल/पी.एच.डी. अशा उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे
• जातीभेद, वर्णभेद, अंधश्रध्दा निर्मुलन या क्षेत्रातील जागृतीसाठी कार्य करणे
• मागासवर्गीय तरूण-तरूणींना विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षासांठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षित करणे.

महाज्योती संस्थेत कोचिंग व मार्गदर्शन विभाग, मदत व समुपदेशन विभाग, ज्ञान कोष विभाग, मूल्यमापन विभाग, शेती, वनशेती, अवर्षण, प्रवण क्षेत्रातील शेती, संशोधन विभाग, सैन्यसेवा भरतीपूर्व प्रशिक्षण विभाग, न्यायसेवा स्पर्धा परिक्षा कोचिंग विभाग, महिला सक्षमीकरण विभाग, नाविण्यपूर्ण प्रकल्प विभाग असे प्रमुख विभाग असतील.

या विभागामार्फत ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन अत्यंत महत्त्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांचे संदेश जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी अन्य थोर समाजसेवकांचे तसेच जातीवर्णावर आधारीत व हुंडाप्रथा या विरूद्ध जनमानसात जागृती करण्यासाठी ‘ज्योतीदूत’ प्रकल्प राबविण्यात येईल, ‘जलदूत’ या माध्यमातून जलसाक्षरता, जलसंवर्धन, सिंचनाबद्दल जनजागृती वाढविणे, जलव्यवस्थापन, पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देणे. शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य नियोजनाबद्दल जागृत करणे आदी उपक्रम राबविण्यात येतिल. सावित्रीदूत संत गाडगेबाबांचे स्वच्छता व व्यसनमुक्तीसाठी असलेले संदेश गावोगावी पोहोचविण्याचे काम करतील. स्त्री पुरूषांमधील विषमता नष्ट व्हावी स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य लाभून मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त व्हावी यासाठी सावित्रीदूत काम करतील.

धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी रु.१०००.०० कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी रु. ५००.०० कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग तसेच राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत चालू योजनांद्वारे धनगर समाजातील घटकांना लाभ मिळत असलेल्या १६ योजना वगळून आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

धनगर समाजासाठी योजना

  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमीहिन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त,मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.
  • वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.
  • राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना भागभांडवल मंजूर करणे.
  • केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे. 
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेबर या ०४ महिन्यासाठी चराई अनुदान देणे. (प्रायोगिक तत्वावर)
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.
  • भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.
  • ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य. 
  • नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.
Previous article”अंमली पदार्थांविरोधात झीरो टॉलरन्स धोरण”, महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
Next articleप्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचे सरकारचे लेखी आदेश; आमदार लक्ष्मण जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × five =