बीड,दि.29जुलै2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) :- बीड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून बीड शहरात सिमेंट रस्ते, भूयारी गटार यासाख्या विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांना आवश्यक असणारी मूलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड नगर परिषदेच्यावतीने 5 कोटी रुपये खर्चाच्या काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी देवी मंदिर परिसर सिमेंट रस्त्याचे लोकार्पण रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच दर्जेदार रस्ते व्हावे. यासाठी बीड शहरातील रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात जवळपास 16 सिमेंट रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईप लाईन तसेच भुमीगत गटारीचे काम सुरु करण्यात आले असून येणाऱ्या काळात ही सर्व कामे पूर्ण होतील. बीड शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी 23 ठिकाणी छोट्या उद्यानाचे काम व लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य यासारखी कामे करण्यात येणार आहेत. शहराच्या विविध विकास कामासाठी शासनस्तरावरुन निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात वॉटर ग्रीडचे काम करण्यात येणार असून यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यात एकूण 11 प्रकल्प राबवले जाणार असून लोखंडी पाईपद्वारे वॉटर ग्रीड जोडले जाणार आहे. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून पहिला टप्पा पिण्याच्या पाण्यासाठी, दुसरा टप्पा शेतीला पाणी तर तीसऱ्या टप्प्यात उद्योगाला पाणी देण्यात येणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचे टेंडर काढण्यात येणार असून कामाचे भूमीपूजनही लवकरच करण्यात येणारअसल्याचे मंत्री क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.
माहेश्वरी प्रगती मंडळ व दिपमाळ योगा मित्र मंडळांने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री.क्षीरसागर यांनी दिपमाळ या ठिकाणी वृक्षारोपण केले. दिपमाळ येथे ध्यान मंदिरासाठी 10 लक्ष रुपये निधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.