राहटणी:(२७जुन२०१९,प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत सर तसेच शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या बद्दल माहिती दिली.
तत्कालीन मागास, मुलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित असलेल्या धर्मव्यवस्थेने अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या सर्व समूहांना त्यांनी राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. २६ जूलै १९०२ साली ५०% आरक्षणाची संरचना मांडून ती लागू केली. ते आरक्षणाचे जनक ठरले. सामाजिक सुधारणांबरोबर शाहू महाराजांनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. शाहू महाराजांनी कोल्हापूरात कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहू महाराजांनी १९१३ मध्ये सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना १९१९ मध्ये ‘राजर्षी पदवी’ बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे पतितांचा उध्दारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. अशा या महान लोकनायक राजाला मानाचा मुजरा!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गेवारे आणि प्रणाली मगर यांनी केले व आभार रोशनी गुप्ता यांनी केले.