पुणे:दि. 6 मार्च 2019(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनीधी)- शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये व्यवस्थापनाने महिला कर्मचा-यांसाठी ‘हिरकणी कक्षाची’ सुविधा निर्माण करून दिली तर व्यवस्थापनालाही त्याचा फायदा होतो. तेथील महिला कर्मचाऱ्यांची आपल्या कर्तव्य व कामाप्रती निष्ठा वाढते. बाळाचे संगोपन चांगले झाल्यामुळे आई व बाळाची प्रकृती उत्तम राहते. त्यामुळे स्तनदा मातांची कार्यक्षमता वाढते. या महिलांचे रजेचे प्रमाण कमी होते. आजारपण दूर झाल्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी होणा-या खर्चात बचत होते. या सर्वांचा परिणाम सामाजिक स्वास्थ वाढण्यास मदत होते. राज्य शासनाच्या धोरणा नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयात स्तनदा मातांसाठी बाळाला वेगळ्या कक्षात बसून स्तनपान देता यावे. या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात होत आहे. असेच सर्व कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष सुरु व्हावेत. खाजगी आस्थापनात देखील सीएसआर फंडातून पुढाकार घेऊन हिरकणी कक्ष सुरु करावेत अशी अपेक्षा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केली.
स्थानिक नगरसेविका व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्षा मनिषा संदीप लडकत यांच्या विशेष प्रयत्नातून भवानी क्षेत्रीय कार्यालयात पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पहिल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा राजश्री नवले, नगरसेविका आरती कोंढरे, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, मंगला मंत्री, राजश्री शिळमकर, नगरसेवक अजय खेडेकर, विशाल धनवडे, भाजपा युवा पदाधिकारी साची संघवी महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग, परिसरातील महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. स्वागत प्रास्ताविक मनिषा संदीप लडकत, आभार साची संघवी यांनी मानले.