पिंपरी:दि.12फेब्रुवारी2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपळे गुरव आणि कासारवाडी परिसरातील प्रस्तावित रिंग रोड रद्द करावा, अन्यथा बाधित नागरिक सामुहिक आत्मदहन करतील असा इशारा पिंपळे गुरव येथे आयोजित केलेल्या बैठकीत देण्यात आला. रिंग रोड बाधितांची बैठक सोमवारी (दि.11 फेब्रुवारी) रात्री पिंपळे गुरव येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर, लक्ष्मी सुर्यवंशी, सुप्रिया शेलार, छाया रोकडे, गवसिया शेख, राजेंद्र देवकर, नाना फुगे, राजश्री शिरवळकर, शिवाजी इबितदार आदींसह बाधित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
आदियाल म्हणाले की, प्रस्तावित रिंग रोडच्या पिंपळे गुरव, कासारवाडी, वाल्हेकर वाडी परिसरात शंभर ते दोनशे मिटर अंतरावर स्पाईन रोड तसेच नाशिक फाटा ते कोकणे चौक भव्य बीआरटी रस्ता आहे. 1987 च्या विकास आराखड्यानुसार होणा-या रिंग रोडमध्ये स्थानिक पुढा-यांनी अनेकदा सोयीस्कर बदल केला आहे. मागील 25 वर्षांत वेळोवेळी निवडणूकीच्या काळात आमदार, खासदारांनी एकही वीट पाडू देणार नाही. असे वारंवार जाहीर भाषणात सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील महिन्यात शहरात आले होते. तेंव्हा रिंग रोड बाधित नागरिकांच्या समन्वय समितीने हॉटेल सिट्रस येथे त्यांना निवेदन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुर्नसर्वेक्षणाचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यांचे आदेश देखील प्रशासन धाब्यावर बसवत आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना घरे देण्याची घोषणा करतात. त्यासाठी देशभरातील अनधिकृत घरे अधिकृत करु असे जाहीर करतात. तर त्यांच्याच अधिपत्याखाली असलेले राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंतप्रधानांच्या विचारांच्या विरुध्द भुमिका घेत असल्याचे दिसते. मागील तीस, चाळीस वर्षांपासून काबाडकष्ट करुन वेळप्रसंगी बँकांचे कर्ज घेऊन उभारलेली घरे वाचविण्यासाठी आता प्राणपणाने लढू, व पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील प्रस्तावित रिंग रोड रद्द करण्यास महानगरपालिकेला भाग पाडू. आता जर या परिसरात अधिकारी कारवाई करण्यास आले तर महिला भगिनी कुटूंबासह लाट्या काट्या घेऊन रस्त्यावर उतरतील. वेळप्रसंगी सामुहिक आत्महत्या करु. यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहिल. असाहि इशारा या बैठकीत अमरसिंग आदियाल व मनोगत व्यक्त करणा-या इतर महिला भगिनींनी दिला.