पुणे-(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी) ता. २६:- विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे, या उद्देशाने गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
भारतीय संविधानातील मूल्य अधोरेखित करणारी चित्रे, कोलाज, प्रश्नमंजुषा तसेच तुम्ही संविधानातील कोणत्या तत्वांचे पालन करता हे संदर्भात पटवून देणे यांसारख्या स्पर्धा व अनोखे उपक्रम यावेळी घेण्यात आले. यात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. आपल्या कलेतून, कल्पनाशक्तीतून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता आदी संविधानातील महत्वपूर्ण अंग विद्यार्थ्यांनी उलगडले हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या संविधानातील प्रत्येक कलम ही लाख मोलाची असून त्याची प्रत्येक नागरिकांनी दखल घ्यायला हवी व त्याच मार्गाने पाऊल टाकावे. यासाठी शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर यातील मूल्यांचे संस्कार व्हावेत, या हेतूने गोयल गंगा शाळेत संविधान दिन साजरा केला असल्याची माहिती गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी दिली.