*अहमदनगर(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)दि.१८— आधी पैसे भरा, मगच उपचार मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना पैशा अभावी हॉस्पिटल कडून उपचार नाकारण्याच्या घटना दरदिवशी पहायला मिळत आहेत. हि असंवेदनशीलता बदलून माणुसकी प्रस्थापित करण्यासाठी *रूग्ण हक्क कायदा लागू झालाच पाहिजे,* म्हणून सर्वसामान्य माणसाने चळवळीचा पाईक झाले पाहिजे असं अवाहन *रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष अॅड वैशाली चांदणे यांनी अहमदनगर येथे* रुग्ण हक्क परिषदेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना केले.
*यावेळी रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष अॅड वैशाली चांदणे, राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण, सातारा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शेडगे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगीराज धामणे, अहमदनगर शहर अध्यक्ष अजय शहापुरकर, समन्वयक सोमा शिंदे, सल्लागार राजेंद्र शेलार मंचावर उपस्थित होते.*
*यावेळी बोलताना राज्य अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की,* गरीब रुग्णांना उपचार घेणे हा त्यांचा हक्क आहे; परंतु अनेक धर्मादाय रुग्णालये पैशाच्या मागे लागले आहेत. त्यांना गरिबांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही. गरीब रुग्णांवर धर्मादाय रुग्णालयांनी तातडीने उपचार सुरू केले पाहिजेत. असे न केल्यास त्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करायला हवा. यासाठी रुग्ण हक्क कायदा लागू होणे आवश्यक आहे.
यावेळी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगीराज धामणे यांनी स्वागत केले, सूत्रसंचालन अहमदनगर शहराध्यक्ष अजय शहापुरकर यांनी केले. सोमा शिंदे यांनी यशस्वी संयोजन केले. आभार अजय गांगुर्डे यांनी मानले.