पिंपरी-चिंचवड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी)-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमसह 28 एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेस 1992 ला हस्तांतरीत केली आहे. त्या बदल्यात 25 वर्षे उलटूनही 4 भूखंड व 4 कोटी रूपयांचा निधी दिला गेलेला नाही. येत्या महिन्याभरात त्यासंदर्भात पालिकेने कारवाई न केल्यास कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसह स्टेडिमय ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांच्यासह गुणवंत कामगारांनी शुक्रवारी (दि.19) पत्रकार परिषदेत दिला.
मोरवाडी येथे झालेल्या परिषदेला पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे, कार्याध्यक्ष मुकुंद वाखारे, गुणवंत कामगार रामकृष्ण राणे, पंकज पाटील, मोहन गायकवाड आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या की, मंडळाने स्टेडियम व 28 एकर जागा पालिकेस दिली आहे. त्या बदल्यात 5 कोटी रुपये व शहरात 5 भूखंड देण्याचा करार झाला होता. आतापर्यंत 1 कोटी रुपये आणि सर्व्हे क्रमांक 195 चिंचवड येथे 20 हजार चौरस फूट जागा मिळाली आहे.
मोशी सर्व्हे क्रमांक 5 येथे 2 एकर, सेक्टर क्रमांक 25, प्लॉट क्रमांक 290 येथे 25 हजार चौरस फुट, सेक्टर क्रमांक 26 जलतरण तलावाजवळ 2 एकर, थेरगाव सर्व्हे क्रमांक 9 मध्ये दीड एकर हे उर्वरित 4 भूखंड व 4 कोटी रूपये मागील 25 वर्षांच्या व्याजासह पालिकेकडून मिळावेत. त्याबाबत येत्या महिन्याभरात पालिकेने कार्यवाही न केल्यास स्टेडिमय ताब्यात घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणाची वेळोवेळी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, कामगार मंत्री, कामगार कल्याण आयुक्त, सदस्य, शहरातील कामगार नेते, गुणवंत कामगार आदींनी पाठपुरावा केला आहे. गेली 25 वर्षे उर्वरित भूखंड न दिल्याने पालिकेने त्वरित मंडळास विनाविलंब स्टेडियम व जागा परत करावी. अन्यथा कामगार व त्यांच्या कुटुंबीय स्टेडियमच्या ताबा घेतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे म्हणाले की, उद्योगनगरीत कामगारांच्या सुविधेसाठी कामगार मंडळाची आवश्यकता आहे. तो कामगारांचा हक्क आहे. पंकज पाटील म्हणाले की, पालिकेने गुणवंत कामगारांना दिलेले पुरस्कार परत करण्याचा मनोद्य केला आहे. कामगार मंडळाचे मुख्य अधिकारी पुणे विभागासाठी असून, पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी मोहन गायकवाड यांनी केली.